आयुष्य

           आयुष्य म्हटले की सुखदुःखांचा डोंगर असे चटकन डोळ्यासमोर येते. दुःखा पाठोपाठ सुख आणि सुखा पाठोपाठ दुःख येतच असतात. कालचक्र म्हणतात त्याला. देवाने मनुष्याला हे आयुष्य दिले. सुंदर आनंदाने भरलेले, त्यात त्याने त्याची वेळोवेळी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. मनुष्याने उतु नये मातू नये म्हणून त्याच्या सहनशक्तीची परीक्षा देव घेत असतो. आपण देवाचे आभार मानले पाहिजे की आपल्याला सर्व इंद्रियांचे वरदान मिळाले. आपण ऐकतो, पहातो, चालतो, बोलतो, हसतो, खातो, पितो, काम करतो. या इतक्या मोठ्या विश्वामध्ये किती जणांना हे सुख मिळत नाही. आपण आपल्या इंद्रियांचा आदर आणि मान राखला पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपण लहानाचे मोठे होतो मग परत वृद्ध होऊन निसर्गात विलीन होतो. जो नवीन जीव सृष्टीत येतो तो किती मासूम, कापसा प्रमाणे मऊ, दुनियादारी पासून दूर, निर्मळ, सात्विक असतो. त्या मऊ लोण्याच्या गोळ्याला मातीला जसा कुंभार आकार देऊन त्याला भट्टीमध्ये शेकून घट्ट बनवतो त्याप्रमाणे संस्काराचे दूध पाजून समाजाच्या वाईट दृष्ट वृत्ती पासून सावध करून भक्कम, हुशार, चतुर बनवणे हे आपल्या हातात असते. 

           आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. आपण कमवते असु तर सर्व घराची जबाबदारी आपणावर असते. पै पै जमवून त्यातून सांभाळून थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवतो. भविष्यासाठी पुंजी जमा करतो पण त्यांना कामच नाही त्यांनी काय करायचे? आज आणि शिकलेले तरुण तरुणी आपण पाहतो .त्यांना नोकऱ्या नाहीत. काहीजण प्रतिष्ठेपायी आपले जीवन गमावून बसतात. उद्योगधंदे सुरू करण्यासाठीसुद्धा पैसा लागतोच ना? आणि काय करायचे याचे मार्गदर्शन देणारे जर कोणी नसेल तर त्यांची हालत काय होत असेल? आज प्रत्येक वस्तू साठी पैसा लागतो. साधे पाणी प्यायचे असेल तरी बाटलीसाठी दहा रुपये मोजावे लागतात. पूर्वीचा दहा रुपयाचा वडापाव आता पंधरा ते वीस रुपये झाला. या देशात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब आणखीनच गरीब होत चालला आहे. घरगुती सिलेंडर सुद्धा हजार रुपयांचा झाला. ज्यांच्याकडे कमावणाऱ्याचा पगारच जर नसेल तर त्या गृहिणीने घर कसे चालवायचे? 

           मन कधी कधी खूप खचून जाते. नको असे विचार मनात घुमू लागतात. बेरोजगारी घालवण्यासाठी काय करता येईल ज्याने त्यांच्या हातात पैसे येतील? रोटी, कपडा ,मकान ह्या जा मूलभूत गरजा आहेत त्या तरी प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजे एक प्रांजळ विचार मनात येतो. प्रत्येकाला काहीतरी काम शिकवावे आणि त्याच्या हाताखाली दहा वीस लोकांचे तरी पोट भरले जावे अशी तरतूद केली गेली पाहिजे. प्रत्येकात काही ना काही चांगल्या गोष्टी असतात आणि त्याच बरोबर वाईट गुण पण असतात. त्या चांगल्या गुणांचा वापर करून आयुष्य बदलता येते. मला तरी असे वाटते.तुम्हाला काय वाटते?..... सांगा हा़ं..... भेटूया पुढच्या लेखात... धन्यवाद

लेखिका:- साधना अणवेकर

1 comment:

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us