मी माझ्या पायावर



"ताई, मी आज  तुमचे आभार मानायला आलोय , आज  मी माझ्या घरी जाणार!" अगदी आनंदाने सचिन हे सांगत होता. वीस वर्षाचा हा तरुण मुलगा आपल्या पायांवर उभा राहून चालत आला होता. माझ्याकडे तो पहिल्या दिवशी आला होता तेव्हाचा चेहरा आठवला. खूप अंतर होते  त्या दोन चेहर्यामध्ये!

हॅास्पिटलमधून बरे झालेले रुग्ण जेव्हा घरी जायला निघतात तेव्हा ते मला भेटल्या शिवाय जात नाहीत.इतक्या दिवसात त्यांच्याशी नाते जोडले जाते.

सचिनचा त्या दिवशीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आणि त्याचे बोलणे आठवले.  सचिन अगदी काकुळतीने सांगत होता की  त्याला काही त्याचा पाय कापून घ्यायचा नाही. 

तो एका लहान खेड्यातून आला होता.”गावी काहीही उपाय करू नाहीतर आहे तसे राहू देवू , पण पाय कापू द्यायचा

 नाही “, असा त्याचा निर्णय होता. त्याच्या वडिलांचे वय साधारण ५० -५५ असावे. आता खरंतर तरूण मुलाच्या  जीवावर  त्यांनी दिवस काढायचे पण त्यांचे नशिब असे की तरूण मुलाला ते दवाखान्यात  घेऊन आले होते. गावी डॉक्टरांनी  त्याला  मुंबईला नेण्याचे  सांगितले होते. टाटा हॅास्पिटलचे नाव कळताच त्याच्या घरचे घाबरुन गेले होते.पण पैशांची  जुळवाजुळव करुन  ते इकडे आले. 

इकडे त्याच्या आजाराचे निदान केले गेले. त्याला हाडाचा कर्करोग होता. एक पाय गुढग्यापासून  कापावा लागणार होता. त्यानंतर तो बरा होण्याची खूप  शक्यता होती. डॉक्टरांच्या मते तो नक्की बरा होणार होता. पण सचिन काही शक्रकिया करून घ्यायला तयार नव्हता. त्यासाठी डॉक्टरांनी त्याला माझ्याकडे पाठवले होते.

टाटा हॅास्पिटल मुंबईतले एक मोठे हॅास्पिटल .कर्करोगावर इथे उपचार केले जातात.इथे वैद्यकिय समाज सेवक रुग्णांना आजाराची पुर्ण माहिती सोप्या भाषेत देतात. त्यांची भीती कमी करुन त्यांना उपचार पद्धतीत सहभागी केले गेले जाते. काही गैरसमज असतील तर  ते दूर केले जातात. आजाराची पूर्ण कल्पना  देऊन त्यावरील उपचार पध्दतीची माहिती देणे हे वैद्यकिय समाज सेवकाचे  काम असते.  शिवाय हे करते वेळी ती व्यक्ती आणि त्याच्याघरचे त्याच्या  आजाराकडे कसे बघतात , आजाराचा आणि उपचारांचा त्याच्यावर  व त्याच्या कुटुंबियांवर  काय परिणाम  होतात, त्यांचे काय म्हणणे आहे याचाही अभ्यास  केला जातो. सचिन ऑपरेशनला तयार नव्हता हे खरे पण का? हे जाणून घेणे महत्वाचे होते. डॉक्टरांकडे  फक्त तो ’मी तयार नाही’ याचाच घोष करत होता.

सचिनशी मी बोलले. त्याच्या  वडिलांशीपण बोलले. नंतर दोघांशी एकत्रितपणे बोलले.

एखाद्या वागणुकीमागचे कारण जाणून घेतले तर ती व्यक्ती अशी का वागते हे समजून घेता येते आणि त्या वागणुकीत  बदल घडवून आणणे शक्य  होते. जेव्हा आपल्याला  जाणवते की आपले काहीतरी चुकतेय, आपण असे वागणे अयोग्य आहे तेव्हा  आपण बदल घडवून आणतो.

सचिनचे अगदी तरूणपणाचे  दिवस. अजून लग्न झालेले नाही. घरात तो मोठा मुलगा. वडिल शेतीकाम करणारे.  त्यांचे वय झाले आहे. " त्यांना मी  आधार द्यायचा की मीच अपंग होऊन घरी बसायचे?" ,सचिनच्या मनात हे विचार घर करून होते. पाय कापला की अपंग होऊन घरात बसावे लागणार. सचिन त्यामुळे  शस्त्रकियेला  तयार होत नव्हता. 

हे जेव्हा मला  समजले तेव्हा त्याचा हा विचार चुकीचा कसा आहे हे त्याला  दाखवून देणे गरजेचे होते. त्यासाठी मी त्याची २-३ जणांशी भेट घालून दिली, त्यांच्याशी बोलायला सांगितले, त्यांचे  अनुभव ऐकून सचिनला वाटले की आपल्यालाही  काही घरात निकामी बसून रहावे लागणार नाही. कृत्रिम पाय बसवून तो फिरू  शकेल. काही कामकाज

 करून कमावू शकेल. घराचा तो आधार􏰦 होता. शस्त्रकिया नाही केली तर आजार बळावेल व नंतर उपचार करणे कठीण

 जाईल, याची जाणिव करून दिली गेली. सर्व  बाजूंनी विचार केल्यावर सचिन ऑपरेशनला तयार झाला. तो स्वतः डॉक्टरांना आपली तयारी असल्याचे सांगायला गेला.

सचिनचे ऑपरेशन झाले. त्याला  कृत्रिम पाय बसवण्यात आला. तो काही महिने दवाखान्यात भरती होता. त्याच्या गावातली परिस्थिती जाणून घेतली तसेच त्याला कोणते काम करायला आवडेल ह्याबद्दल चर्चा केली गेली. त्यानंतर  

त्या काळात त्याला टायिपंगचे शिक्षण देण्यात  आले. एका सेवाभाची संस्थेने एक टाईपरायटर दिला . त्यामुळे तो आपलेच नव्हे  तर कुटुंबाचे पण पोट  त्याच्या कमाईवर भरू शकणार होता.

आज त्याला  दवाखान्यातून घरी पाठवविण्यात आले होते. आपण आपल्या  घरी जाणार तेही चालत म्हणून तो खूष होता. त्याच्या चेहयावरचा आनंद बघून मलापण खूप बरे वाटले.

(टीप: ही सत्यकथा आहे, नाव बदलले आहे.)

डॉ. सुजाता प्रभूदास चव्हाण 

(संस्थेच्या अक्षरधारा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील सहभागी लेख)


No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us