उपकार


उपकार या शब्दांमध्ये किती औदार्य, शक्ती, दानी पणा दडलेला आहे .कोणावरही केलेले उपकार कधीच खाली जात नाही उलटे दुप्पट तिप्पट गतीने भरभरून आपल्याला देते. धरती मातेचे तर असेच आहे ना? किती ममत्व आहे तिच्या उपकारात. आपल्याला सुजलाम्- सुफलाम् करून अन्नधान्य , निवाऱ्याची कसलीच कमतरता ती भासू देत नाही. जन्मल्यापासून आपण सर्वांच्या उपकारात असतो. या जगात आपल्याला आणले  यासाठी सर्वप्रथम आई-वडिलांचे उपकार मानले पाहिजे. त्यामुळेच आपण हे जग ,ही सृष्टी पाहू शकलो. ह्या जीवनाचा आनंद घेऊ शकलो. त्या डॉक्टरांचा किती मोठा हात असतो ते सुखरूप आपल्याला जगात येण्यास मदत करतात. तान्ह्या बाळाला अमृततुल्य दूध पाजून धष्ट पुष्ट करणाऱ्या मातेचे, तेलाचे मालिश करून अंगात नवचैतन्य आणणाऱ्या  तेल मालिश मावशी, आपली उत्कर्षाची उंची गाठण्यासाठी पैशाची तजवीज करणारे आपले वडील, ज्ञानाचा भंडार आपल्यामध्ये भरणारे शिक्षक गुरु, जीवन सहज सुंदर बनवणारी भावंडे ,आप्तेष्ट ,हितचिंतक, मित्रपरिवार ह्यांचे उपकार किती असतात. त्यांच्यामुळेच तर या कठीण जीवनाचे जहाज संकटात  सुद्धा तग धरून राहते. 

आपण आपल्या देशाप्रती खूप प्रेम करतो. देशासाठी सीमेवर वर्षानुवर्षे थंडी उन्हात, कठीण वातावरणात तैनात असणाऱ्या सैनिकांचे आपण उपकार मानायला हवे कारण आपण जे मस्त जीवन जगतो त्याचे श्रेय या वीर जवानांना जाते. आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून देशासाठी वाहून घेण्याची जिद्द वाखाणण्याजोगी असते. शेतकरी या धरणी मातेचे भूमिपुत्र. तिची सेवा करून मशागत करून त्यातून सोन्यासारखे पीक काढतात. लाखो करोडो लोकांचे पोट भरणे ही काही साधी गोष्ट नाही. पण निसर्गाच्या सानिध्यात राहुन तिच्या मर्जीवर धान्य पिकवायचे, ते जतन करायचे, त्या मातीच्या पोषणाची जबाबदारी त्या भूमिपुत्रा वरच असते. त्यांचे किती उपकार असतात हे आपल्यावर! आपण जे अन्न खातो ते शिजवायला आपल्याला किती वेळ आणि कष्ट लागतात पण ते आपल्या ताटात येण्यासाठी किती अपार कष्ट असतात ना??? 

देवाने निर्मिलेल्या ह्या सृष्टीत प्रत्येकाचे एक दुसऱ्यावर अवलंबून राहणे आणि त्यांच्या संगतीने चालणे हेच सृष्टिचे चक्र चालू ठेवण्यासाठी महत्वाचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन मूलभूत अति आवश्यक  गरजा पुऱ्या करण्यासाठी दिलेल्या शक्ती साठी देवाचे आभार मानले पाहिजे. सृष्टीने आपल्याला हिरवीगार जंगले, विविध प्राण्यांची आणि पक्ष्यांची, फुलांची आणि फळांची देणगी दिली आहे. ती जोपासणे आपले कर्तव्य आहे. मानवाला राहण्यासाठी जंगले तोडणाऱ्या आणि सिमेंटची जंगले उभारणारांनी हे लक्षात ठेवायलाच पाहिजे की "अति तिथे माती " अशी म्हण आहे. निसर्गाला जर तुम्ही डीचवले तर त्याचा परिणाम सुनामी, चक्रीवादळे, आगडोंब, पूर येणार आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा  अंत हा होणार. पूर्वी काळापासून चालत आलेल्या पूजा पाठ, यज्ञपाठ, होम हवन , देवाचे नामस्मरण यातून मिळणारी मनशांती आधुनिक काळासाठी सुद्धा चांगलीच आहे. सदृढ आयुष्यासाठी देवाचे आभार  मानले पाहिजे. मानवाने आणलेल्या मानवनिर्मित संकटाला तोंड देण्यासाठी दिलेले धैर्य हे उपकारच आहे आपल्यावर. तुम्हाला काय वाटते? सांगा हा........

भेटूया पुढच्या लेखात........ धन्यवाद

लेखिका:- साधना अणवेकर

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us