सरते वर्ष

वर्ष सरले वर्ष सरले 

दरवर्षी हेच तर आपण म्हणतो 

काय असे नवीन बदलते सांगा

शेवटच्या दोन आकड्यांचाच तर  हा डाव असतो ।।


 इतर वर्षांसारखे  हेही  एक वर्षच तर संपत असते

 सूर्य तोच उगवतो अन तोच मावळतोही 

बदलत जातात ऋतू त्यांच्या आळीपाळीने 

तूच एक गड्या माणूस म्हणून काही बदलत नाही ।।


अख्खं वर्ष जातं तुझं काबाड कष्ट करण्यात 

वेळही नाही पुरत स्वतःसाठी जगण्यास, 

वर्ष संपले की मग लागते हुरहुर जीवाला

संधी जाते निघून अन माणूस दोष देतो  स्वतःस ।।


 खरं तर कळतच नसते काय करायचे

 वादळात  तरायचे कि मरून जायचे, 

 येतो जीव थकून भागला बिचारा

 दर वर्षी  गड्या हेच तर चालायचे ।। 


  दुसऱ्यांचे सुख बघण्यात तुझे आयुष्य संपून जाते

 तीच माणसे तेच जग सांग कधी हे बदलायचे, 

 जुनीच खाट रोज झोपायला तयार तुझ्यासाठी

 उद्याची पहाट कशी येईल हेच नाही कळायचे ।।


 काय गमावले काय कमावले

 याचा हिशोब लागत नाही, 

 वर्षभराच्या साऱ्या दुःखासमोर

 सुख  काही तुला दिसत नाही ।।


 वर्ष सरते  मात्र  वजा राहते बरेच काही

 संकल्प जातो विसरून आपण  पुन्हा  ते जगणे नाही, 

 निघून जाते संधी विधात्याने दरवर्षी दिलेली

 जगून घे गड्या आता उद्याच्या काही भरवसा नाही ।।


 विसरून जा आता ते जुने वर्ष

 कर जोमाने संकटांशी  संघर्ष, 

 म्हण जिद्दीने असेल हे माझेच वर्ष

 मनात ठेव कायम प्रेम , माया अन हर्ष ।।


 दरवर्षी बदलेल फक्त आकडा शेवटचा

 गड्या तू माणूस म्हणून बदलू नकोस,  

 साथ दे तू  तुझ्याच माणसांची कायम

 हरलास तरी चालेल  पण जगणं सोडू नकोस। 

 गड्या जगण सोडू नकोस ।।।।


 शीतल ....

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us