हिरव्या रंगाची जादू


जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता...... आपले राष्ट्रगीत म्हणताना डोळ्यासमोर भारदस्त भारताचा तिरंगा फडकतो आणि आपले हृदय कसे भरून येते. त्या तिरंग्यावरती असणाऱ्या केशरी, सफेद आणि हिरव्या रंगात मस्त निळ्या रंगाचे अशोक चक्र असते. त्या हिरव्या रंगाला पाहून प्रसन्नता, सु समृद्धता, आनंदीपणा ,सुजलाम सुफलाम पणे विस्तृत पसरलेली शेती आठवते. मन कसे त्या शेतात धावत राहते. हवेच्या झुळकीने डोलणारी मस्त शेती आणि त्यात असणारे मेहनती शेतकरी. माळरानावरची फुले, पाने सर्वत्र कशी प्रफुल्लता. समाधानकारकतेने भरलेला असतो हा हिरवा रंग. पानांचे रंग पाहिले ना किती वेगवेगळ्या छटा असतात त्यामध्ये? लाईट हिरवा, गडद हिरवा ,पोपटी कितीतरी छटा असतात. सूर्यप्रकाश आपल्याकडे खेचून हरितद्रव्य ही पाने बनवतात. प्रवासाला जाताना गाडीच्या खिडकीतून मी हीच झाडांची पाने न्याहाळत असते. किती विविध छटा! उंच डोंगरावरच्या पानांची तर रंगतच न्यारी असते. मधेच गडद मधेच सौम्य रंगाने भरलेली निरनिराळ्या आकारा मधील हिरवी पाने बघताना खूप मजा येते. 

मन सुद्धा असेच हिरवे असायला हवे. "पिकल्या पानांचा देढ कि हो हिरवा" ही लावणी ऐकली की खरच असे वाटते की आपले आयुष्य पण असेच पुढे निघून जाते. एक दिवस वृद्धापकाळ म्हणजेच पिवळे पडते पण आपले मन आपले हृदय सतत हिरवे म्हणजेच ताजेतवाने, प्रसन्न आणि सदृढ ठेवले पाहिजे. देवाच्या या चक्रामध्ये शरीर कधीही नश्वरच आहे पण आत्मा हा अनंतापर्यंत तरुण रहाणारा असतो. योग्याभ्यास द्वारे हा हिरवा रंग शक्ती च्या रूपाने, पुण्याचे रूपाने, चैतन्याच्या रूपाने आपल्यात भरला जातो. काळानुसार वाचन, मनन, चिंतन करायला हवे. ज्ञानाची पेरणी करता यायला हवी. बुद्धी तीक्ष्ण आणि चाणाक्ष ठेवायला हवी. 

स्त्रियांच्या जीवनात हिरव्या रंगाला विशेष प्राधान्य आहे. हिरवा चुडा हे सौभाग्यवतीचे लक्षण. लग्नात चढवलेला हा हिरवा रंग त्या हिरव्या बांगड्या सोबत आपल्या लग्नानंतर च्या काळात आपल्या सतत सोबतच असतो. एक तेज येते हिरवा चुड्यामुळे. त्यातही रेशमी हिरव्या बांगड्या, कचकडी हिरव्या बांगड्या अशा विविध बांगड्यांचे रंग मन मोहून टाकतात. देवीला ओटी भरताना या हिरव्या बांगड्यांची ओटी हमखास दिली जाते. हिरव्या रंगाचा शालू, हिरवा चुडा भरलेली स्त्री कपाळावर कुंकवाचा टिळा लावून किती सौंदर्यवान दिसते. खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा हा हिरवा रंग पालक ,वाटणा, घोसाळी, दोडका ,मेथी, आंबट चुका, शेपू या आणि अशा अनेक भाज्यांमध्ये दिसतो. शरीरातील जीवनसत्वे वाढवण्यासाठी ह्या उपयुक्त असतात. आज काल आपण जेवणातील मेनू जसे हराभरा कबाब, पालक पनीर ग्रेव्ही, तिरंगा पुलाव, हिरवे मटण ,चिकन आपण खातो ना? खूप सुंदर लागतात हे पदार्थ. खाण्यासाठी सुद्धा तेवढेच उत्कृष्ट आणि आरोग्यदायी असतात. पिस्त्याचे मोदक ,लाडू, खस (वाळा) चे सरबत, कोथिंबीरची हिरवी चटणी कितीतरी पदार्थ हिरव्या रंगातले मस्तच असतात. 

माझा स्वतःचा हिरवा रंग हा आवडता कलर आहे . यातील कुठलीही रंगछटा नेहमीच आल्हाददायक आणि फ्रेश असते. पोपटाला पाहिलं की किती मन प्रसन्न होते ना? मोराच्या अंगावरील गर्द हिरवा रंग आणि त्याचे ते मोर पंख, मन कसे प्रसन्न होते आणि त्याच्याकडे पाहातच राहावे असे वाटते. तुम्हाला काय वाटते??.......... सांगा  हां. 

भेटूया पुढच्या लेखात......... धन्यवाद

लेखिका :-साधना अणवेकर

1 comment:

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us