डिक्की घडवणार पाचशे नवउद्योजक


एससी व एसटी प्रवर्गातील तरुण नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) संस्थेच्या वतीने भारत सरकारच्या अपेडा आणि राज्य सरकारच्या एमएआयडीसीच्या सहाय्याने प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत पाचशे नवउद्योजक घडविण्याचे काम होणार असून हा प्रकल्प भारत सरकारच्या स्टॅंडअप इंडिया प्रकल्पांतर्गत राबविला जाणार असल्याची माहिती डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आज दिली.

डिक्की व अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी व अन्नधान्य प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यात क्षेत्रातील संधी याविषयावर आज पुण्यात जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मिलिंद कांबळे बोलत होते. यावेळी अपेडाचे उपसरव्यवस्थापक आर. के. मंडल, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक सत्यजीत वार्डे, पश्चिम भारत डिक्कीचे अध्यक्ष निश्चय शेळके, उद्योजक राजकुमार धुरगुडे पाटील, महाराष्ट्र डिक्कीचे अध्यक्ष संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व डिक्की यांच्या दरम्यान सामंजस्य करार झाला.

कृषी आणि अन्नधान्य प्रक्रिया उद्योगात निर्यात क्षेत्रातील संधीबाबत आज नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाबरोबर सामंजस्य करार झाला. आणि ही संस्था व भारत सरकारची अपेडा संस्था यामुळे एससी व एसटी प्रवर्गातील तरुण उद्योजक होण्यासाठी मदत होणार आहे. सरकारच्या या विभागाशी संबंधीत योजना आणि उद्योग करण्यासंदर्भातील माहिती, प्रशिक्षण देण्यासंदर्भात डिक्की काम करीत आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या स्टॅंडअप इंडिया प्रकल्पांतर्गत जोडला जाणार असल्याने त्याला विशेष मदतदेखील मिळेल. याचा उपयोग वंचित घटकांतील तरुणांना नोकरी मागणारे नाही तर, देणारे बनविण्यासाठी होऊ शकेल, असा विश्वास मिलिंद कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.

अपेडा या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या उद्धारासाठी इतके मोठे काम होत असल्याचा आनंद आहे. याबरोबरच डिक्की या संस्थेमुळे वंचित घटकांतील तरुणांना उद्योजक बनविणे शक्य होणार आहे. अपेडाच्या अनेक योजना असून यासंदर्भात उद्योग सुरु करण्यास इच्छुक असलेल्यांनी अपेडाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी व संपर्क करावा, असे आवाहन आर. के. मंडल यांनी केले.

बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने वास्तवात आणण्यासाठी डिक्की कार्य करीत असल्याचा अतिशय आनंद आहे. डिक्कीच्या उपक्रमांना मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे उद्योजक राजकुमार धुरगुडे पाटील यांनी सांगितले.

Source : Tarun Bharat

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us