ई विश्व आणि टपालखाते



डाकिया डाक लाया... हे गाणे म्हणत एकेकाळचा नंबर एकचा हीरो राजेश खन्ना गाणे गात लोकांची पत्रे पोचवायचा. शहर, गाव कोठेही पत्र पोचवणारे हमखास साधन म्हणजे पोस्ट. खरंतर दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती होण्यापूर्वी आपण सर्वजण टपालखात्यावर अवलंबून होतो. सुखदु:खाचे क्षण असोत वा पैसे मागविणे या सगळयाशी संबंध होता टपाल खात्याचा. आपल्या सर्वच गोष्टींचा साक्षीदार म्हणून टपालखाते काम करीत होते. पण काळ बदलला. दळणवळणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. साध्या फोनचेही अप्रूप वाटणारे दिवस वायफाय, आयपॉडच्या जमान्यात केव्हाच मागे पडले आहेत. कार्यालयाच्या कामानिमित्ताने पोस्ट ऑफीसला भेट दिली. मनात नसतानाही गेलो होतो त्यामुळे थोडी चिडचिड सुरू होती पण तेथे गेल्यानंतर चिडचिडची जागा उत्साहाने घेतली. टपाल खात्याचे पारंपरिक वातावरण बदलून आता त्यांनी ई विश्वात पर्दापण केल्याचे पदोपदी जाणवत होते.

टपाल कार्यालयांना नवीन लुक' देण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी पोस्ट ऑफिस ऑन व्हील' अशा योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. टपाल खात्याने आपल्या ग्राहकांना आधुनिक काळात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, त्यात एटीएम', इंटरनेट', फोन' आणि एसएमए बॅंकिंग'ची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. टपाल कार्यालयामार्फत ई मनिऑर्डर, आयकोड, वर्ल्डनेट एक्सप्रेस, ई लेटर अशा सुविधा टपाल विभागाने नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मोबाईल व इंटरनेट मुळे पोस्टकार्ड, आंतरदेशीय यांचा वापर बंद होऊन टपाल वाटप करणा-यांना कर्मचा-यांच्या रोजी रोटीवर गदा येईल अशी भीती व्यक्ती केली जात होती. परंतु भारतीय टपाल विभागाने इंटरनेटचा वापर करुन ग्राहकांना जलद व चांगली सेवा या माध्यमातून दिली आहे. ई मनिऑर्डरमुळ शहरी भागात पाच मिनिटात तर ग्रामीण भागात दुसऱ्या दिवशी मनीऑर्डर संबंधित व्यक्तीला मिळते. 

वेळ वाचविण्यासाठी भारतीय टपाल खात्याने आयकोड ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेंतर्गत तरुणांनी टपाल कार्यालयातून ३००/- रुपयांचे कार्ड विकत घेवुन ते स्क्रॅच करायचे त्यावरील संकेत क्रमांकावर आपली संपूर्ण माहिती लिहून संबंधित ठिकाणावर पाठवायची त्यानंतर तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीसाठी बोलावणे येते. नोकरी ही शासकीय किंवा ,खाजगी क्षेत्रातील असू शकते. या योजनेच्या माध्यमातून अनेकांना नोक-या मिळाल्याची माहिती नाशिकचे पोस्ट मास्तर पी. डी. कुलकर्णी यांनी दिली.

पूर्वी परदेशात पत्र पाठविण्यासाठी फार वेळ लागत असे परंतु आता टपाल विभागाने वर्ल्डनेट एक्सप्रेस योजना सुरु केल्यामुळे तीन दिवसात कोणत्याही देशात पार्सल, पत्र पाठविता येते, खाद्यपदार्थ, औषधे अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू पाठविता येतात. यामध्ये अर्धा किलो वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी ९००/- रुपये खर्च येतो. तर पुढील प्रत्येक अर्धा किलो वजनासाठी १७५/- रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. या सेवेच्या अधिक माहितीसाठी १८००२३३२९६९ या टोल फ्री फोन क्रमांकावर माहिती देण्यात येत आहे. आधुनिक काळातील वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टपाल खाते आता कात टाकत आहे. हे सारे बदल ग्राहकांना हवेहवेसे आहेत हे जाणवले. 

रवींद्र ठाकूर

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us