हृदयरोग, मधुमेह व इतर आजारांसाठी मानसोपचाराचे तंत्र


गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. 

गेल्या काही वर्षांत, एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलॉजी (झछख). शरीर व मन एकमेकांवर कसे परिणाम करतात, याचा तो अभ्यास आहे. भारतीयांसाठी खरं तर ही संकल्पना वेद काळापासून आहे. या संकल्पनेवर आधारित एक परिणामकारक तंत्र म्हणजे गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन. 

गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे. हे तंत्र इतर वैद्यकीय उपचारांना पूरक असेच आहे. मन आणि शरीर यांचा परस्परसंबंध वैद्यकशास्त्राने मान्य केला आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधे, व्यायाम व पथ्ये याबरोबरच मन:स्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रे, तसेच गायडेड इमेजरी यांचा मानसिक व शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो. ताणतणाव, क्रोध, दु:ख, अपराधगंड, भीती आणि इतर नकारात्मक भावना हृदयरोग, तसेच मधुमेहासाठी अतिशय घातक आहेत. संशोधनाअंती सिद्ध झालेय, की गायडेड इमेजरी तसेच इतर स्वास्थ्यतंत्राद्वारा निर्माण होणारी स्वस्थ अवस्था या भावनांचा निचरा करते. रक्तदाब व नाडीची गती तसेच रक्तातील शर्करा नियंत्रणात आणायला मदत करते. हृदयरोग संशोधनामधील मैलाचा दगड मानला गेलेल्या डॉ. डीन ओर्निश ह्यांनी सिद्ध केले होते, की आहार, व्यायाम तसेच स्वस्थतेची तंत्रे यांनी कॉरोनरी हार्ट डिसीजवर मात करता येते. याच स्वस्थतेच्या तंत्रांमध्ये गायडेड इमेजरी व व्हिज्युएलायजेशन फार मोलाचे योगदान देऊ शकते. 

अशा पद्धतीची स्वस्थतेची तंत्रे अनेक प्रगत देशांतील क्‍लिनिक्‍समध्ये व इस्पितळात वापरली जातात. त्याने हॉस्पिटलमध्ये कमी काळ राहावे लागणे, वेदना कमी होणे व काही केसेसमध्ये औषधांचा परिणाम लवकर होणे, ती कमी लागणे हेही घडलेय. 

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन- मन व शरीराचे एकमेकाशी असलेले नाते व मनाचा शरीरावर होणारा परिणाम या तत्त्वावर हे तंत्र आधारित आहे. 

गायडेड इमेजरी ही एक प्रणाली आहे, ज्यामध्ये तुम्ही कल्पनेचा वापर करून स्वस्थता व शांततेच्या निवांत प्रदेशात जाता. निसर्गातील प्रतिमा व दृश्‍यांचा परिणामकारक उपयोग केला जातो. त्यासाठी तज्ज्ञाची गरज असते. निवांत व तरल अवस्थेत गेल्यावर तुम्ही तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण लक्ष शरीरातील आजारी अवयवावर किंवा विशिष्ट सिस्टिमवर केंद्रित करता, उदा. हृदयरोगात, कॉरोनरी हार्ट डिसीजमध्ये रोहिणी काठीण्य म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये मेद जमा होतो. वाहिन्या अरुंद होतात. या अवस्थेतील व्यक्तीला हृदयाची आजारी स्थिती डोळ्यांसमोर आणायला सांगितली जाते. त्या स्थितीवर फोकस करून वाहिन्यांमधील मेद विरघळत आहे, वाहिन्या रुंद होत आहेत, हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत आहे व प्राणवायू मिळत आहे, हे चित्र तीव्रपणे उभे केले जाते. हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेले जाते व सेशन समाप्त होते. 

डायबेटीससाठी - आपला कोमट श्‍वास डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतोय. तिथे विरघळतोय. तेथील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या उघडल्या जातायत. त्यांच्यात आवश्‍यक ते बदल, दुरुस्ती होतेय. त्या सक्षम होतायत. काही काळ तेथे थांबून हा श्‍वास मेंदूच्या अफलातून अशा जाळ्यांमध्ये शिरतोय. तेथील नाजूक मज्जातंतू व अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या उघडल्या जातायत, स्वस्थ होतायत. निर्माण झालेले व होऊ शकणारे अवरोध, अडथळे दूर होतायत. माझ्या प्रत्येक श्‍वासगणिक विलक्षण तेजस्वी, शीतल आणि सुखद असा प्रकाश जादू करतोय. शरीरातील सर्व यंत्रणा स्वस्थ होत जातायत. हाच प्रकाश पॅन्क्रियामध्ये प्रवेश करतोय. तेथे अस्तित्वात असलेल्या पेशींच्या समूहाला उत्तेजित करतोय, ज्यायोगे त्या शरीराला आवश्‍यक तेवढे व शरीर वापरू शकेल एवढेच इन्शुलिन तयार होतेय. ते शरीरातील पेशींपर्यंत व्यवस्थित पोचते आहे. हे इन्शुलिन एखाद्या किल्लीप्रमाणे काम करत आहे, ज्यायोगे जणू काही अन्नासाठी भुकेल्या पेशींचे दरवाजे उघडत आहेत आणि पेशींना व्यवस्थित पोषणमूल्य मिळत आहे. हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेले जाते व सेशन समाप्त होते. वारंवार व प्रभावीपणे उभ्या केलेल्या कल्पनाचित्रांचा, अंतर्मनाच्या शक्तीचा हा विलक्षण आविष्कार असतो. 

गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशनदरम्यान, मेंदूतील, भावना नियंत्रण केंद्रांकडे, सकारात्मक सूचना पाठवल्या जातात, ज्यापुढे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम व इम्यून सिस्टिमकडे जातात, ज्याचा चांगला परिणाम हार्ट रेट, रक्तदाब, रक्तशर्करा यांवर होतो. चांगली संप्रेरके स्रवली जातात. आजार लवकर बरा होण्याच्या दृष्टीने, शरीर अनुकूल व तत्काळ प्रतिसाद देऊ लागते. 

सेशननंतर व्यक्तीला अतिशय शांत, उत्साही व टवटवीत वाटते. याप्रमाणे प्रकृतीनुसार अनेक सेशन्स केली जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. रक्तशर्करा व लिपिड प्रोफाईलवर अनुकूल परिणाम होतो. आत्मविश्‍वास वाढतो. ताण नाहीसा होतो. 

वर वर्णिलेली उदाहरणे फक्त कल्पना येण्यासाठी दिली आहेत. प्रत्यक्षात आजारी व्यक्तीची भावनिक जडणघडण, एकूण मानसिक स्थिती वगैरे लक्षात घेऊन तज्ज्ञ स्क्रिप्ट तयार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे स्क्रिप्ट असू शकते व सेशन्सची संख्या वेगळी वेगळी असू शकते. होऊन गेलेला आजार पुन्हा उद्‌भवू नये यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो. 

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन तंत्राचा उपयोग पुढील आजारातही होऊ शकतो - 1: कर्करोग- केमोथेरपी सुसह्य करण्यासाठी, 2) वेगवेगळे ट्यूमर्स, 3) गरोदरपणात, 4) शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत सुधारणा होण्यासाठी, 5) शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, 6) नैराश्‍य व मानसिक अवस्थेतेचे आजार, 7) निद्रानाश व झोपेचे विकार, Cool वजन कमी करणे, 9) मायग्रेन, 10) होऊन गेलेले विकार पुन्हा होण्यापासून प्रतिबंध होणे इत्यादी. डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधे, व्यायाम, पथ्ये ह्यांच्या जोडीला या तंत्राचा तज्ज्ञांच्या साह्याने अतिशय परिणामकारक असा उपयोग होऊ शकतो


डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ज्ञ, पुणे.

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us