जिजाऊसाहेब - इंद्रजित सावंत


माता असावी तर जिजाऊसाहेबांसारखी, असं सार्थ अभिमानानं म्हटलं जातं. मोठ्या जिद्दीनं जिजामातेनं पुत्र शिवबाची जडणघडण केली... पुढं शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागं खरी प्रेरणा होती ती जिजाऊसाहेबांचीच... 

"जिजिआऊ वालिदा-द-राजा शिवाजी' म्हणजे राजा शिवाजींची माता "जिजाऊ' ही राजमाता जिजाऊसाहेबांची मुद्रा आहे. जिजाऊसाहेबांच्या सदरेवरून सुटणाऱ्या आज्ञापत्रांच्या माथ्यावर दिमाखात ही मुद्रा उमटवली जात असे. होय स्वतंत्र मुद्रा! तीही एका स्त्रीची! हे शिवकाळात एक आश्‍चर्यच होतं. ज्या काळात स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते, त्या काळात शिवाजीराजांची ही माता आपली मुद्रा वापरत होती. एवढंच नव्हे तर, राजसदरेवर बसून न्यायनिवाडेही करीत असे. जिजाऊसाहेबांनी दिलेली न्यायनिवाड्याची काही पत्रंही आज उपलब्ध आहेत त्यावर उमटवलेल्या त्यांच्या मुद्रेसह. जिजाऊंनी दिलेला निर्णय पुत्र शिवबा तर मानत असेच; शिवाय सर्व गोतसभाही एकमुखानं हा जिजाऊंचा निर्णय मानत असे.

जिजाऊसाहेबांच्या कर्तबगारीचे दाखले-पुरावे मराठ्यांच्या इतिहासात अनेक मिळतात. त्यांनी शेतीसाठी शिवगंगा नदीवर बांधलेली लहान धरणं आजही सुस्थितीत आहेत. या नदीच्या काठावर त्यांनी बसवलेले पेठ शिवापूर ही व्यापारी पेठ आजही नांदती आहे. पुण्याजवळील खेडे-बाऱ्यात जिजाऊंनीही लोकोपयोगी कामे करून घेतली. या गावाजवळच जिजाऊंची खासगी शेती (शेरी) ही कामथडीच्या ओढ्याला लागून होती. अशी लोकोपयोगी कामं करणाऱ्या जिजाऊसाहेब राज्यकारभारातही भाग घेत असत.

सन 1666 मिर्झाराजा जयसिंगाशी तहात ठरल्याप्रमाणं शिवाजीराजांना आग्य्राला जावं लागले. राजे आग्य्राला दिनांक 6 मार्च 1666 रोजी स्वराज्यातून निघाले. तिथे ते 17 ऑगस्ट 1666 पर्यंत औरंगजेबाच्या कैदेत होते. तिथून निसटले आणि चार महिन्यांनी 21 नोव्हेंबर 1666 मध्ये म्हणजे जवळजवळ नऊ महिन्यांनी स्वराज्यात परत आले. या नऊ महिन्यांच्या काळात स्वराज्याचा कारभार जिजाऊसाहेबांनीच सांभाळला होता आणि नुसता सांभाळला नव्हता; तर ऑगस्ट 1666 मध्ये कोल्हापूरजवळील प्रसिद्धगड ऊर्फ रांगण्याचा बेलाग-दुर्गम-दुर्गही जिंकून स्वराज्याच्या सीमा वाढवल्या होत्या, असे हे राजमातेचे प्रशासन होते. 

अशा या कर्तबगार मातेनं शिवरायांची जडणघडणच अशा तऱ्हेनं घडवली होती, की त्यातून "स्वराज्य संस्थापक शककर्तेची निर्मिती झाली आणि भारताला एक महान नृपती मिळाला. नुसता राज्यकर्ते घडवून आपले कर्तव्य करून देव-देव करीत बसणाऱ्या जिजाऊ नव्हत्या. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील येसाजी कंक, तानाजी मालुसरे अशा स्वराज्याच्या सरदार-सुभेदारांच्या कुटुंबांची काळजीही जिजाऊसाहेब करीत असत. यासंबंधीचे एक जिजाऊंचे पत्रच उपलब्ध आहे. रायगडाच्या पायथ्याला गुंजनमावळातील विठोजी शिलंबकर यांनी आपल्या कन्येचा विवाह गोमाजी नाईकांच्या पुत्राशी ठरवला होता; पण लढाईच्या धामधुमीत या तोलदार शिलंबकरांच्या जिंदगानीची धूळधाण उडाली होती. त्यामुळे विठोजीराव लग्नाची तारीख पुढे-पुढे ढकलत होते. जिजाऊसाहेबांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी विठोजीरावांना पत्र पाठवलं. हे पत्र म्हणजे जिजाऊ स्वराज्यातील मावळ्यांना कशा प्रकारे मदत करीत, त्यांची भाषा कशा वळणाची होती. त्यांच्यात सामान्य रयतेविषयी काय भावना होत्या, यावर स्पष्ट प्रकाश टाकते. या पत्रात जिजाऊ लिहितात, 

""अजरक्‍तखाने रा. जिजाबाईसाहेब प्रति विठोजी हैबतराव सिलंबकर देशमुखतर्फे गुंजनमावळ, तुम्ही आपली कन्या गोमाजी नाईकांच्या लेकास दिधली. लग्न सिधी कारणे तुम्हास हुजूर बोलाविले. तुम्ही सांगितले, की सांप्रत रोजीचे खावयास नाही आणि लग्न सिधी कैसी होईल. त्यावरून तुम्हांस होन 25 व 500 माणसांचे जेवणाचे सामान दिधले असे. लग्न सिध करणे.'' 

अशा तऱ्हेनं या राजमाता स्वराज्यातील रयतेची काळजी घेत असत आणि म्हणूनच स्वराज्यासाठी शिवरायांसाठी हेच सामान्य लोक, असामान्य गोष्टी करीत. कोणी बाजीप्रभू खिंडीत धारातीर्थी पडत; तर कोणी सामान्य नाभिक शिवाजी काशीद खुशीने मृत्यूच्या पालखीत बसे; तर कोणी तानाजी आपल्या मुलाचे लग्न सोडून सिंहगडासारखा गड घेता घेता आपले प्राण देत असे. 

स्वराज्याची शिवरायांची खरी प्रेरणा जिजाऊसाहेबच होत्या. जिजाऊंच्याशिवाय स्वराज्याची कल्पना, स्थापना, विस्तार त्यावर आलेल्या फत्तेखान - अफझलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजा-दिलेरखान-पठाण अशा अनेक संकटांचा यशस्वी सामना या विषयांचा विचार, अभ्यास जिजाऊसाहेबांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. शिवरायांनी 6 जून 1674 रोजी स्वतःस राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने "राजमाता' झाल्या. पण त्या फक्त राजमाताच नव्हत्या. खऱ्या अर्थाने त्या महाराष्ट्राच्या लोकमाता होत्या. लखोजी जाधवरावांसारख्या पराक्रमी पित्याच्या कन्या. शहाजी महाराजांसारख्या महान पराक्रमी पतीच्या पत्नी आणि शिवाजीराजांसारख्या शककर्तेची माता अशा अनेक रुपांत जिजाऊसाहेब आपल्यापर्यंत येतात. त्यातून त्यांच्या चरित्रातील पंचाहत्तर-शहात्तर वर्षांच्या आयुष्याचा एक विस्तारित पटच आपल्यासमोर येतो. तो मांडताना-लिहिताना शब्दांच्या मर्यादा सांभाळाव्या लागतात. असो. आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्‍यातील "सिंधखेड राजा' इथल्या जाधवांच्या वाड्यातील त्यांचे जन्मस्थळ (त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला.) आणि राजधानी रायगडाच्या पायथ्याला "पाचाड' या गावी असणारा त्यांचा वाडा, त्यांची समाधी (जिजाऊंचा मृत्यू शिवराज्याभिषेकानंतर लगेचच 17 जून 1674 रोजी झाला.) ही ठिकाणं आपली प्रेरणास्थानेच आहेत.

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us