बुलढाण्यातलं एक आगळं गाव


गाव करील ते राव काय करील अशा आशयाची एक म्हण आहे. गावात असलेला एकतेची शक्ती गावाचा कसा विकास करते आणि त्यातून आदर्श कार्य समोर येतं अशाच स्वरुपाचं काम बुलढाणा जिल्हयातील माळविहीर या १५० उंबऱ्याच्या गावातील लोकांनी करुन दाखवलं आहे. 

गावच्या पारावर हनुमान मंदिर आहे त्याच्या मंडपात बसून विठ्ठलराव रामभाऊ आडवे माहिती देत होते की या गावाची ग्रामपंचायत १९७० साली स्थापन झाली.गावात असणाऱ्या एकीची साक्ष त्यापुढील काळातल्या वाटचालीतून दिसते. गेल्या ४२ वर्षांमध्ये या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. प्रत्येक वेळी अविरोध सदस्य निवड त्याचप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच यांचीही अविरोध निवड करण्याची परंपरा या गावामध्ये आहे. 

लगतच बसलेला गावच्या सरपंच उषा सुनील खयवाल यांनी गावच्या लोकांबाबत सांगितलं की गावात सदस्यांची वा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याच्या वेळी सर्व ग्रामस्थ एकत्र बसून विचारणा करतात .ज्याला सदस्य व्हायची इच्छा आहे त्याने आपली इच्छा प्रगट करायची आणि इतरांनी संमती द्यायची इतक्या साध्या पध्दतीने सहजरित्या सदस्य व पदाधिकारी निवडले जातात. 

येथील पोलिस पाटील देवीदास संपतराव आडवे हे आहेत. तंटामुक्तीची चळवळ सुरु झाल्यानंतर गावातल्या या एकीचं बळ अधिकच वाढीला लागलं .गावकऱ्यांनी एकत्र बसून या तंटामुक्तीत सहभागी व्हावं असा निर्णय घेतला. तंटामुक्ती योजनेची घोषणा झाल्यापासून गावात वाद झाले नाही असं नाही परंतु हे वाद सर्वांनी एकत्र बसून मिटवले. आजवर या गावातून साधा अदखलपात्र गुन्हा घडल्याचीही नोंद नाही. योजना सुरु होण्यापूर्वी जी प्रकरणे न्यायालयात होती तितकीच काय ती जूनी वादाची नोंद. या गावाच्या कामाची नोंद घेऊन गावाला तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार देवून नुकतच गौरविण्यात देखील आलं आहे. 

गावाच्या कामाची दखल घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे गाव विकासासाठी दत्तक घेण्यात आलं आहे. बँकेन गावाचा मुख्य रस्ता सिमेंटने बांधून दिला तसच ग्रामस्थांच्य सुविधेसाठी एक सुंदर अशी ग्रंथालयाची इमारत देखील बांधून दिली आहे.

हनुमान मंदिरा समोरच एक मोठा पार बांधण्यात आला आहे. गावातलं प्रत्येक लग्न या एकाच ठिकाणी होतं. सगळं गाव लग्नात निमंत्रित असतं आणि काम करायलाही असतं हे विशेष घरालगत घर म्हटलं की शेजार आणि त्यात वादाचे प्रसंग येत असतात मात्र थोडं समंजसपणानं वागता आलं तर खूप मोठं कार्य उभं राहतं हेच या गावानं करुन दाखवल.

प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us